सुस्वागतम् ...... मराठी विभाग प्रमुखांचा संदेश..........
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी “
कवी - सुरेश भट
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्व लोकसमूह मराठीतूनचव्यवहार करतात, त्यामुळे महाविद्यालयातील मराठी विभाग व त्याद्वारे केले जाणारे अध्यापन व्यावहारिक, शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक व वाड़मयीन दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते . तसेच राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी हा विषय असतो व या परीक्षा मराठी माध्यमातून सुद्धा घेतल्या जातात यादृष्टीनेही या विषयाला महत्त्व प्राप्त होते.
मराठी विभागात एक पूर्णवेळ शिक्षक व एक तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी जनरल हा विषय कला शाखेतील सर्व वर्गाचे विद्यार्थी घेऊ शकतात. त्याद्वारे त्यांना भाषिक कौशल्ये प्राप्त होतात तसेच मराठी भाषेचे अद्ययावत ज्ञानही मिळते. जे विद्यार्थी मराठी हा विषय विशेष स्तरावर निवडतात त्यांना मराठी साहित्याचा किमान परिचय असावा लागतो. या पातळीवर विद्यार्थ्यांना विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमातील क्रमिक ग्रंथांचा अभ्यास कसा करावा, ग्रंथपरिचय, ग्रंथसमीक्षा याबद्दलचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करून दिले जाते. याशिवाय विशेष विविध साहित्यप्रकार व भाषाविज्ञान हे दोन विषयही मराठी साहित्य व भाषेचे वैज्ञानिक दृष्ट्या ज्ञानप्राप्तीसाठी व त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.
विभागातील प्राध्यापक हे अभ्यासक्रमाची रचनेबद्दल जागृत असतात व वेळोवेळी अभ्यास मंडळाला सूचना करीत असतात. यापूर्वी एक प्राध्यापक हे विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य व दुसरे अभ्यासक्रम उपसमितीचे सदस्य होते. सर्व प्राध्यापक विविध चर्चासत्रे, परिसंवाद यांच्यामध्ये साधनव्यक्ती (वक्ते) म्हणून सहभागी होत असतात. एक प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच. डी. चे मार्गदर्शक असून (निवृत्त प्राध्यापक व) त्यांचे एकूण १४ विद्यार्थी एम. फिल. व पीएच. डी. झाले आहेत. सध्या डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ०४ विद्यार्थी पीएच. डी. पदवीसाठी संशोधन करीत आहेत दोघांचे एकूण १९ ग्रंथ प्रसिद्ध असून त्याला महाराष्ट्र शासनासह अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यापैकी काही ग्रंथमहाराष्ट्रातील विविध विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. दोघांचे अनेक शोधनिबंध मान्यवर नियतकालिकेतून आजवर प्रसिद्ध झाले आहेत.
मराठी विभागातर्फे १९८९ पासून भि. ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव, यांच्या सहकार्याने राज्यपातळीवरील भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार ही योजना सुरू करण्यात आली असून, दरवर्षी महाराष्ट्रातील चार लेखकांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन मान्यवर लेखकांच्या शुभहस्ते दिले जाऊन त्यांचा सन्मान केला जातो. मराठी ग्रामीण साहित्यातील सर्व प्रकारांना (कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, ललित लेखन, आत्मकथन) पुरस्कार देऊन ग्रामीण लेखकांना प्रोत्साहित करणारी महाराष्ट्रातली रोहमारे ट्रस्ट ही आजही ही एकमेव संस्था आहे. आजपर्यंत या योजनेद्वारे महाराष्ट्रातील १६० पेक्षा जास्त लेखकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश प्राप्त करून देण्याबरोबरच समाजामध्ये व पुढे उत्तम भाषिक कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी दरवर्षी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वगैरे स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून पुढे उत्तम वक्ते, लेखक, कवी, संपादक निर्माण झाले आहेत. विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच वाड़्मय मंडळ, बहिशा:ल शिक्षण मडळ यांच्याद्वारे महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंत, लेखक, कवी यांची व्याख्याने आयोजित केली जातात व विद्यार्थ्यांना लेखन व वक्तृत्व, - वादविवाद स्पर्धा यासाठी मार्गदर्शन केले जाते. दरवर्षी. विभागतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडयानिमित्त विविध स्पर्धा घेतल्या जातात व यशस्वी विद्यार्थाना मराठी राजभाषागौरव दिनी ग्रंथ भेट व प्रमाणपत्र देऊन मान्यवर लेखकांच्या हस्ते गौरविण्यात येते.
आम्हाला हे सांगायला अभिमान वाटतो की, या महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले जवळपास २२ पेक्षा अधिक प्राध्यापक विविध महाविद्यालयात कार्यरत आहेत तर कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून आजही अनेक अध्यापक विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून अध्यापन करीत आहे तर एक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊन आज शासनामध्ये शिक्षणाधिकारी व एक नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. १५ पेक्षा जास्त विद्यार्थी नेट व सेट परीक्षा उतीर्ण झाले आहे. तसेच महाविद्यालयातर्फे केल्या जाणाऱ्या विविध पत्रव्यवहारासाठी विभागातर्फे सहकार्य केले जाते.
विभागातील डॉ. ता. रा. पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ डिसेंबर २०१९ रोजी निवृत झाले. व शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ या वर्षासाठी प्रा. डॉ. व्ही. पी. लंगोटे यांची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना इतरत्र सोईची नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी ३० ऑगस्ट २०२२ ला राजीनामा दिला. व त्यांच्या जागेवर ०७/०९/२०२२ पासून प्रा.एस.बी. आहेर यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा.डॉ . गणेश देशमुख
मराठी विभाग प्रमुख